मुलींच्या जन्मास प्रोत्साहन देणे, त्यांच्या शिक्षणासाठी आर्थिक मदत करणे, मुलींच्या सक्षमीकरणासाठी प्रयत्न करणे या उद्देशाने केंद्र व राज्य शासनाच्या स्तरावरून लेक वाचवा, लेकीला शिकवा या स्वरूपाचा धोरणाला श्रीसिध्दिविनायक गणपती मंदिर न्यासाचाही हातभार लागावा या हेतुने महाराष्ट्रातील शासकीय रूग्णालयात जन्मास आलेल्या बालिकांच्या नावाने 10,000 रुपयांचे फिक्स डिपॉझिट (Fixed Deposit) स्वरूपात त्यांच्या मातेच्या खात्यावर ठेवण्याबाबतची योजना प्रस्तावित करण्यात आली आहे. या योजनेच्या (Shri Siddhivinayak Bhagyalakshmi Yojana) अंतर्गत 8 मार्चला जन्मलेल्या मुलींच्या नावाने 10 हजार रुपयांची मुदत ठेव केली जाणार आहे. ‘लेक वाचवा व लेक शिकवा’ मोहिमेला प्रोत्साहन देण्यासाठी ट्रस्टकडून हा निर्णय घेण्यात आला आहे.आता सरकारच्या मान्यतेची प्रतीक्षा आहे.
सिद्धीविनायक ट्रस्टचे अध्यक्ष सदा सरवणकर यांनी सांगितले की, सिद्धीविनायक न्यायाच्या उत्पन्नात भरघोस वाढ झाली आहे. सरत्या आर्थिक वर्षात ट्रस्टला 133 कोटींचे उत्पन्न मिळाले. मागील आर्थिक वर्षाच्या तुलनेत 15 टक्क्यांनी उत्पन्नात वाढ झाली असल्याचे सरवणकर यांनी सांगितले. सन 2024-25 साठी न्यासाचे अपेक्षित उत्पन्न 114 कोटी रुपये इतके धरण्यात आले होते. आशिर्वचन पूजा देणगी, लाडू व नारळवडी यासंदर्भात विश्वस्त व प्रशासन यांच्या नियोजनामुळे उत्पन्न रू 114 कोटीवरून रू 133 कोटीच्या घरात गेले आहे, ही प्रशंसनीय बाब आहे. सन २०२५-२६ या पुढील वर्षासाठी न्यासाचे अपेक्षित उत्पन्न रू 154 कोटी इतके गृहीत धरण्यात येत आहे.