राज्यातील विधानसभा निवडणूकीच्या प्रचारात महायुतीकडून सरकार आल्यास लाडक्या बहिणींना 2100 रुपये देणार असल्याचे जाहीर करण्यात आले होते. आता सरकार स्थापन झालेले आहे. त्यामुळे लाडक्या बहिणींना 2100 रुपये कधी मिळणार असा प्रश्न उपस्थित होत आहे. अशातच आता मार्चमध्ये होणाऱ्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात याबाबत निर्णय होण्याची शक्यता आहे. त्यानंतर नवीन आर्थिक वर्षात म्हणजे एप्रिलपासून लाडक्या बहिणींना 2100 रुपये मिळण्याची शक्यता आहे.

राज्यातील महिला व बाल कल्याण विभाग लाडकी बहीण योजनेतील लाभार्थी महिलांच्या अर्जाची पडताळणी करत आहे. यानुसार लाडक्या बहीण योजनेचा लाभ घेणाऱ्या महिलांच्या एकत्रित अथवा विभक्त कुटुंबात पती किंवा सासऱ्यांच्या नावावर चारचाकी वाहन असेल तर त्यांना फटका बसणार आहे. घरात दोघांपैकी कोणाकडेही चारचाकी असल्यास महिलांना या योजनेचा लाभ मिळणार नाही. आगामी काळात अंगणवाडी सेविका घरोघरी जाऊन चारचाकी वाहनांची तपासणी करणार आहेत, त्यानंतर अशा महिलांना या योजनेतून वगळले जाणार आहे.